संत नामदेवांची अभंगगाथा भाग-8

संध्येतील संकलीत नामावली १
१०३. केशव कैवल्य कृपाळ । नारायणे उद्धरिला अजामेळ।
माधव मनीं धरा निश्चळ । गोविंद गोपाळ गोकुळीचा। १ ।
विष्णु विश्वाचा जिव्हाळा । मधुसूदन माउली सकळां ।
त्रिविक्रमें रक्षिले गोकुळा । वामने पाताळा बळी नेला। २।
श्रीधरें धरा धरिली पृष्ठी। हृषिकेश उभा भीवरेतटी।
पद्मनाभ पुंडलिकासाठी। दामोदरें गोष्टी पांडवांशी। ३ ।
संकर्षणे अर्जुनासी संवाद केला । वासुदेवें अवचितां वाळी वधिला।
प्रद्युम्न समुद्रावरी कोपला। अनिरूद्ध छेदिला सहस्रबाहो। ४ ।
पुरुषोत्तमे केला पुरुषार्थ । अधोक्षजें हिरण्यकश्यपा मारिली लाथ ।
नरहरी प्रल्हादा रक्षित। स्मरावा अच्युत स्वामी माझा। ५।
जनार्दने रावणादि वधिले। उपेंद्रे अहिल्येसी उद्धरिले।
हरिहरि म्हणतां दोष जळाले। कृष्णे तारिले गणिकेसी। ६ ।या चोवीस नामांचे करिता स्मरण । जन्ममरणांचे होय दहन।
विष्णुदास नामा करी चिंतन । चरण ध्यान मज देईं। ७ ।
१०४. केशव नारायण हा जप आमुचा । सर्व हा मंत्राचा आत्माराम।।
माधव गोविंद सर्वशास्त्री आहे । उभारूनियां बाहे वेदुसांगे। २॥
नामाचेनि पाठे तरूं हा भवसागरू। आणिक विचारू नेणों आम्ही। ३ ।
विष्णु मधुसूदन हे दैवत आमुचें। नित्य . नामाचे सार आम्हां। ४।
त्रिविक्रम वामन सर्व ब्रह्मांड नायकु । हाचि जप सम्यकु आम्हा घटीं। ५।
श्रीधर हृषिकेश मंत्रराज जपा। पावाल स्वरूपा विष्णुचिया।६।
पद्मनाभ दामोदर हा नामाचा विस्तार। करितां विचार तरले जीव। ७ ।
संकर्षण वासुदेव पंढरीचा राणा । सांगितल्या खुणा खेचरराये। ८।
प्रद्युम्न अनिरूद्ध दैवत कुळींचें। पुंडलीक तयाचें तप सार । ९ ।
पुरूषोत्तम अधोक्षज वैकुंठ निर्मळ । जपतां सकळ पापें जाती।१०।
नरसिंह अच्युत नामाचे कवच । जपतां होय वेच संसारासी । ११ ।
जनार्दन उपेन्द्र नाम हे अमृत । शंकर निवांत जपें सदा।१२।
हरी कृष्ण विष्णु सर्व घटीं नांदे । तोचि पैं आल्हादे उच्चारिजेसु। १३।
ऐसा नाम महिमा उपदेशु गोमटा । नामेंचि वैकुंठा भक्त गेले । १४।
नामा म्हणे ते मूर्ति पंढरीये गोमटी। नामें उठाउठी भेटी देती। १५ ।
संध्येतील संकलीत नामावली समाप्त


Comments

Popular posts from this blog

संत नामदेवांचे अभंग गाथा भाग - 4

संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 5

संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 6