संत नामदेवांची अभंगगाथा - 1

  1. संत नामदेवांची अभंगगाथा

                 ‌‌‌          मंगलाचरण 

    १.प्रथम नमन करूं गणनाथा। उमाशंकराचिया सुता ।

    चरणावरी ठेवूनि माथा । साष्टांगीं आतां दंडवत । १ ।

     दुसरी वंदूं सारजा । जे चतुराननाची आत्मजा।

    वाकसिद्धि पाविजे सहजा । तिच्या चरणवोजा दंडवत । २ ।

    आतां वंदूं देव ब्राह्मण । ज्यांचेनि पुण्यपावन ।

    प्रसन्न होऊनी श्रोतेजन । त्यां माझें नमन दंडवत । ३ ।

    आतां वंदूं साधु सज्जन । रात्रंदिवस हरीचें ध्यान ।

    विठ्ठल नाम उच्चारिती जन । त्यां माझें नमन दंडवत । ४ ।

    आतां नमूं रंगभूमिका । कीर्तनीं उभे होती लोकां ।

    टाळ मृदंग श्रोते देखा । त्यां माझें दंडवत । ५ ।

    ऐसें नमन करोनि सकळां । हरीकथा बोले बोबड्या बोला ।

    अज्ञान म्हणोनि आपल्या बाळा । चालवी सकळां नामा म्हणे। ६ ।

    २. प्रथम नमूं गजवदनु । गौरीहराचा नंदनु ।

    सकळ सुरवरांचा वंदनु । मूषकवाहनू नमियेला । १ ।

    त्रिपुरावधीं गणाधिपति । हरें पूजिला भावें भक्ती ।

    एके बाणें त्रिपुर पाडिला क्षितीं । तै पशुपति संतोषला । २ ।

    इंद्रादिकी अष्टलोकपाळीं । लंबोदरू पूजिला कनककमळीं ।

    त्यासी प्रसन्न झाला तयेवेळी । ह्मणवूनी सकळी पूजियेला । ३।

    सटवें रात्री मदनु शंभरें नेला । प्रद्युम्न समुद्रामाजी टाकिला ।

    तैं कष्णे विघ्नहरु पूजिला । प्रद्युम्न आला रतीसहित । ४ ।

    पुजिला साही चक्रवर्ती । त्यांचिया पुरती आर्ती ।

    युधिष्ठिरे पूजिला चतुर्थी । राज्य प्राप्ति झाली तया । ५।   

    ह्मणवूनि सुरवरीं केली पूजा। त्रिभुवनीं आणिक नाहीं दुजा।विष्णुदास नामा म्हणे स्वामी माझा। भावें भजा एकदंता। ६ ।

    ३. गणेश नमूं तरी तुमचा नाचणा। म्हणोनि नारायणा नमन माझें। १ ।

    सारजा नमूं तरी तुमची गायणी । म्हणोनि चक्रपाणि नमन माझें। २ ।

    इंद्र नमूं तरी तुमचिया भुजा । म्हणोनि गरुडध्वजा नमन माझें। ३ ।

    ब्रह्मा नमूं तरी तुमचिये कुसी। म्हणोनि हृषिकेशी नमन माझें। ४ ।

    शंकर नमूं तरी तुमची विभूती । म्हणोनि कमळापति नमन माझें। ५ ।

    वेद नमूं तरी तुझाचि स्थापिता। म्हणोनि लक्ष्मीकांता नमन माझें। ६।

    गंगा नमूं तरी तुमच्या अंगुष्ठी । म्हणोनि जगजेठी नमन माझें। ७ ।

    लक्ष्मी नमूं तरी तुमच्या पायांतळी। म्हणोनि वनमाळी नमन माझें। ८ ।

    ऐसें नमन माझें सकळिकां देवां । नामा म्हणे केशवा नमन माझें। ९ ।

    ४. गाण जरी म्हणों तरी गणेश सारजा। आणीक नाहीं दुजा तया वांचूनी। १ ।

    नाचणू म्हणों तरी तांडववीं महेश्वरू । तो एक नृत्यकारु करूं जाणे। २।

    बोलका म्हणों तरी बोलके वेद चारी। त्याने काय उरी जें मी बोलों। ३।

    जाणु म्हणों तरी अठराही जाणे। त्या काय उणें जें मी जाणों। ४ ।

    कळावंत म्हणों तरी चंद्र सूर्य दोन्ही। बारा सोळा गगनीं दाविताती। ५ ।

    नामा म्हणे सर्व अवघे वंचले। केशवें आपुलें म्हणावें मातें। ६ ।

    ५. देवा आदिदेवा सर्वत्रांच्या जीवा। ऐकें वासुदेवा दयानिधी। १।

    ब्रह्मा आणि इंद्रा वंद्य सदाशीवा । ऐकें वासुदेवा दीनबंधु । २।

    चौदा लोकपाळ करिती तुझी सेवा। ऐकें वासुदेवा कृपासिंधु। ३ ।

    योगियांचे ध्यानीं नातुडसी देवा । ऐकें वासुदेवा जगद्गुरु। ४ ।

    निर्गुण निर्विकार नाहीं तुज माया। ऐकें कृष्णराया कानडिया। ५ ।

    करुणेचा पर्जन्य शिंपी मज तोया । ऐकें कृष्णराया गोजरीया । ६ ।

    नामा म्हणे जरी दाविशील पाया। तरी वदावया स्फूर्ति चाले। ७ ।                                         

    Comments

    Popular posts from this blog

    संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 5

    संत नामदेवांचे अभंग गाथा भाग - 4

    संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 6