संत नामदेवांची अभंगगाथा -2 ‌‌

संत नामदेवांची अभंगगाथा -2 ‌‌                                                        ‌‌‌‌‌           चरणवंदन ‌‌‌‌                ‌                ‌‌‌     

६.दीनाची माऊली। आजि म्यां देखियेली। १।
 कटी ठेउनियां कर । उभी राहे विटेवर । २।
मुगुट रत्नांचा साजिरा । वरी मोतियांचा तुरा । ३।
रुप लावण्य गोजिरें। हृदयी पदक साजिरें । ४ ।
कासे पिवळा पीतांबर। चरणी ब्रिदाचा तोडर । ५ ।
भक्ता कृपेची साउली। नामा वंदी पायधुळी। ६।
७. विटेवरी समचरण सुंदर। बाळ सुकुमार यशोदेचें। १ ।
वाळे वांकी गर्जे तोडर चरणी । नाद झणझणी वाजताती। २ ।
कांसे कसियेला पीत पीतांबर । लोपे दिनकर तेणें प्रभा । ३ ।
नामा म्हणे नाही तुझ्या रूपा पार। तेथें मी किंकर काय वानूं । ४ ।
८. समचरणी उभा कैवल्याचा गाभा। देत असे शोभा पीतांबर।।
चरणीचा तोडर गर्जे दैत्यावरी । मोरपीसा शिरी खोविली असे । २ ।
कंठी कौस्तुभमाळ कुंडले शोभती। मावळलीही ती रविशशी। ३ ।
कस्तुरीचा टीळा व्यंकटी भृकटी। कंदर्पाच्या कोटी न तुळसी । ४ ।
नामा म्हणे याच्या प्रकाशाच्या तेजे । उरले नाही दूजे कोण ठाई। ५।
९. श्रीमुख साजिरें कुंडलें गोमटीं। तेथे माझी दृष्टी बैसलीसे। १।
कटावरी कर समचरण साजिरे । देखावया झुरे माझें मन । २।
माहेरीची आस दसरा दिवाळी। बाहे ठेवी निढळी वाट पाहे। ३।
बंदिजन नामा उभा महाद्वारीं। कीर्ति चराचरीं वर्णितसे । ४ ।
१०. सुखाचें हें सुख श्रीहरि मुख । पाहतांही भूक ताहान गेली। १।
भेटली भेटली विठाई माउली। वासना निवाली जिवांतील । २ ।
चंद्रासी चकोर मेघासी मयूर। वाटे तैसा भर आनंदाचा । ३।
नामा म्हणे पाप आणि ताप दुःख । गेलें झालें सुख बोलवेना। ४ ।
११. आवडे जें जीवा ते पंढरिये उभें । पुंडलिकें लोभे राहविलें। 
जोडुनि पाऊलें ठेवियलीं विटे । करद्वय गोमटें कटावरी । २॥
कान मुख डोळे न म्हणती पुरे। सेवितां न पुरे धणी मना। ३।
गोड लागे पोट न भरे न धाय । भुकेलीच राहे भूक सदा। ४।
नामा म्हणे संतसंगती विश्वास । घेऊं अनुभवास फार फार । ५।
१२. कस्तुरीचा टिळा रेखिला कपाळी । तेणें ते शोभली मूर्ति बरी।।
बरवा बरवा विठ्ठल गे बाई । वर्णावया साही शिणताती। २ ।
श्रीवत्सलांछन वैजंयती गळां । नेसला पाटोळा तेज:पुंज। ३ ।
पाउले समान विटेवरी नीट। नामा म्हणे भेट घ्यावी त्याची। ४ ।
१३. ब्रह्म अविनाश आनंदघन । याहुनि चरण गोड तुझे। १।
ते जीवें न सोडी अगा पंढरीनाथा। जाणसीं तत्वतां हृदय माझें। २ ।
परात्पर वस्तु जे कां अपरंपार । तियेचा साक्षात्कार पाय तुझे। ३।
सच्चिदानंदघन जेथें हरपले मन । त्याहुनि चरण गोड तुझे। ४ ।
नामा म्हणे तुझीं पाउलें सुकुमार। तें माझें माहेर विटेवरी । ५ ।
१४. झणी दृष्टी लागे तुझ्या सगुणपणा । जेंणें माझ्या मना बोध केला। १ ।
अनंता जन्मींचे विसरलों दुःख। पाहतां तुझे मुख पांडुरंगा। २।
योगियांच्या ध्यानी ध्यातां नातुडसी। तो तूं आह्मांपाशीं मागे पुढे। ३ ।
नामा म्हणे जीवें करीन निंबलोण। विटेसहित चरण वोंवाळीन। ४ ।
१५. आनंद अद्वय नित्य निरामय। जे का निज ध्येय योगियांचे। १।
ते समचरण साजिरे ठेवुनि विटेवरी। उभे भीमा तीरी पंढरीये|२।
जे पुराणांसी वाड श्रुती नेणती पार। ते झाले साकार पुंडलिका । ३।
नामा म्हणे ज्याचे सनकादिकां ध्यान । ते माझे कुळदैवत पंढरीराव। ४।                                                            १६. जे ज्ञानियांचे ज्ञेय ध्यानियांचे ध्येय । पुंडलिकांचे प्रिय सुख वस्तु। १ ।
ते हे समचरण उभें विटेवरी । पहा भीमातीरी विठ्ठल रूप। २।
जें तपस्वियांचे तप में जपकांचे जाप्य । योगियांचे गौप्य परम धाम। ३ ।
जें तेजकांचें तेज में गुरु मंत्राचे गुज । जें पूजकांचे पूज्य कुळदैवत। ४ ।
जें जीवनातें जीवविते पावकातें निववीतें । जें भक्तांचे उगवितें मायाजाळ । ५।
नामा म्हणे तें सुखचि आयतें। जोडलें पुंडलिकातें भाग्य योगें। ६।

Comments

Popular posts from this blog

संत नामदेवांचे अभंग गाथा भाग - 4

संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 5

संत नामदेवांची अभंगगाथा भाग - 6