संत नामदेवांचे अभंग गाथा भाग - 4
* भूपाळी व काकड आरतीचे अभंग २७. उठाउठा प्रभात जाहली। चिंता श्रीविठ्ठल माऊली। दीन जनांची साउली । येई धाउनि स्मरतांचि।१।। पंढरपुरी जे भिमातटीं। सुंदर मनोहर गोमटी। दोन्ही कर ठेवोनियां कटी। भेटीसाठी तिष्ठतसे। २।। किरीट कुंडले मंडित । श्रीमुख अति सुंदर शोभत। गळां वैजयंती डुलत । हार मिरवत तुळसीचा। ३। सुरेख मूर्ति सगुण सांवळी । कंठी कौस्तुभ एकावळी। केशर उटी परिमळ आगळी । बुका भाळी विलसतसे। ४ । पीत पीतांबर कसला कटी। अक्षयी वीट चरण तळवटी। सकळ सौंदर्य सुखाची पेटी। हृदय संपुष्टी आठवा तें। ५ ।अति प्रिय आवडे तुळसी बुका। तैसीच प्रीति करी भोळ्या भाविका। नामा पदपंकज पादुका। शिरी मस्तकीं वंदितसे ।। २८. उठा जागे व्हारे आतां । स्मरण करा पंढरिनाथा। भावें चरणी ठेवा माथा। चुकवा व्यथा जन्माच्या।। धन दारा पुत्रजन। बंधु सोयरे पिशुन। सर्व मिथ्या हे जाणून । शरण रिघा देवासी।। मायाविघ्ने भ्रमलां खरे । म्हणतां मी माझेनि घरें। हे तो संपत्तीचे वारें । साचोकारें जाईल। ३। आयुष्य जात आहे पहा । काळ जपतसे महा। 'स्वहिताचा घोर वहा । ध्यानी रहा श्रीहरीच्या। ४। संत चरणी भाव धरा । क्षणक्षणा नाम स्मरा। ...